तसं पाहिलं तर पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या अनेक आवर्तनातील असाच एक क्षण! रात्रीच्या बहरलेल्या आकाशात चंद्राच्या विविध तारासमूहात भटकताना आढळलेला pattern आणि त्यावरून ठरलेला हा चैत्र महिना. आणि अशा pattern मध्ये धरलेला एक reference point म्हणजे हा पहिला दिवस चैत्राचा.
10, 9, 8, 7 असं म्हणत अचानक गुढी वर नेल्याचे कुठे ऐकिवात तरी नाही, किंवा times square, harbour bridge वर कधी नयनरम्य रोषणाईही केल्याचं पाहिलं नाही, सुर्यासारख्याच सहजतेने गुढी वर जाऊन सुर्यास्ताला खाली येते आणि हे नवीन वर्ष सुरु होते. नाही म्हणायला हल्ली जागोजागी भल्या मोठ्ठया रांगोळ्या आणि दिमाखदार शोभायात्रा निघतात. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा म्हणत विविध रंगानी नाहून निघत पाडवा येतो.
रामाने दक्षिण दिग्विजय गाजवून परतल्यावर राज्याभिषेकाचाही हाच दिवस आणि सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा शौर्यधुरंधर राजपुत्र संभाजी राजांना अनंत छळ होऊन वीरमरण प्राप्त झाले तोही हाच दिवस!
चैत्र वणवा सुरु होऊन अगदी अंगाची लाही लाही होणार, डोंगर नद्या कोरडे होणार, पण अशा ऋतुचक्रालाही उत्सवांने साजऱ्या करणाऱ्या हिंदू वर्षांचा, नव्हे नव्हे भारत वर्षाचा हा पहिला दिवस.
सर्वेपी सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः,
सर्वे भद्राणी पश्चन्तु, मा कश्चित दुःखवात भवेत
म्हणणाऱ्या हिंदू संस्कृती चा हा पहिला दिवस आहे!
हे सूर्या, तू तर सगळंच पाहतो जाणतोस, जाता जाता आज थोडा विरंगळून सगळ्या मानवतेला हा संदेश दे आणि सांग कि, "अशी संस्कृती अगणित आक्रमणातून तावून सुलाखून निघून आता पुन्हा फिनिक्स पक्षासमान भरारी घ्यायला तयार होत आहे", हे ही सांग की "तिच्यामध्ये तुझ्यासमान अन्यायाविरूद्ध दाहकता आणि प्रेमाची ऊब असा दुहेरी संगम आहे" आणि "हे विश्वची माझे घरं" म्हणत पुन्हा एकदा मानवतेला एक नवी दिशा द्यायला हि संस्कृती समर्थ आहे!"
- देवेंद्र ओक
मनातं नवंचैतन्य निर्माण होईल असे उत्कृष्ट लिखाण!
ReplyDelete